नांदेड,बातमी24:- शेतकऱ्याची फसवणूक करणार्या केंद्राच्या कृषी विषयक कायद्याच्या विरोधात काँग्रेसने यल्गार पुकारला असून गुरूवार दि. 15 ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे होणार्या सभेचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या सभेच्या थेट प्रेक्षपणासाठी नांदेड येथे भव्य व्हच्युअल सभेचे आयोजन करण्यात आले असून 20 ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण जिल्ह्यातून शेतकर्यांच्या समर्थनार्थ सुमारे दिड लाख नागरिकांच्या सह्यांचे निवेदन महसुलमंत्री बाळासाहेब थोरात व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या माध्यमातून काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांना देण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे विधान परिषदेचे प्रतोद व महानगराध्यक्ष आ.अमरनाथ राजूरकर यांनी आज येथे दिली.
केंद्र सरकारने देशातील शेतकर्यांना देशोधडीला लावणार्या तीन कृषी विधेयकांना मंजुरी दिली आहे. यामुळे शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसणार असून सावकारशाही वाढणार आहे. या विरोधात राज्याच्या वेगवेगळ्या भागात अनेक आंदोलने सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून 15 ऑक्टोबर रोजी संगमनेर येथे काँग्रेसचे प्रभारी एच.के.पाटील, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये यल्गार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या संदर्भात जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात आ.अमरनाथ राजुरकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमहापौर मसुद खान, जि.प.चे माजी अध्यक्ष दिलीप पा.बेटमोगरेकर, काँग्रेसचे कोषाध्यक्ष विजय येवनकर, डिपीडीसीचे सदस्य एकनाथ मोरे, सभागृह नेते विरेंद्रसिंग गाडीवाले, प्रवक्ते संतोष पांडागळे, तालुकाध्यक्ष अॅड.निलेश पावडे, बालाजी गव्हाणे, जगदिश पाटील भोसीकर, उध्दवराव पवार, बालाजी पांडागळे आदींची उपस्थिती होती.