जयपाल वाघमारे
नांदेड,बातमी24:- पदवीधर निवडणूक काही दिवसांवर आली आहे.मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचे नांदेड जिल्ह्यातील दौरे निष्क्रिय ठरत असून यास सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची नाराजी हे सुद्धा त्यापैकी एक कारण मानले जात आहे.त्यामुळे उमेदवार सतीश चव्हाण यांचा नांदेड जिल्ह्यातील मार्ग खडतर असल्याचे पदवीधर मतदारामधून चर्चा होत आहे.
सलग तीन टर्म आमदार राहिलेल्या सतीश चव्हाण यांच्या पदवीधर मतदारांची नाराजी असून पदवीधर मतदारांच्या संदर्भाने सभागृहात आवाज न उठविता भांडवलदारी संस्थाचालक व गुत्तेदार म्हणून ते अधिक सक्रिय राहिलेले आहेत,असा त्यांच्यावर सातत्याने आरोप होत असतो.
इतर जिल्ह्याच्या तुलनेत, नांदेड जिल्ह्यात सतीश चव्हाण यांचे दौरे झाले असले,तरी आमदार म्हणून त्यांच्या दौऱ्यात अत्यल्प प्रतिसाद मिळालेला आहे.विशेषतः अशोक चव्हाण यांची नाराजी महत्वाचा विषय आणला जात असून जिल्ह्याच्या राजकारणावर अशोक चव्हाण यांचे निर्विवाद वर्चस्व आहे.अशोक चव्हाण स्वतः सक्रिय नसल्याने काँग्रेसची पहिली,दुसरी फळी कुठे प्रचारात उतरल्याने बघायला मिळालेले नाही.
नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आस्तित्व तसेही नगण्य असेच आहे.शिवसेना ही ना निवडणुकीत जिल्ह्यात कुठेही सहभागी नाही,या सगळ्या अडचणी पाहता,सतीश चव्हाण यांचा नांदेड जिल्ह्यापुरता का असेना मार्ग खडतर असल्याचे बोलले जात आहे.