वसमत /हिंगोली / नांदेड,बातमी 24:-वसमत येथे दि.१३ ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या आगमनाप्रसंगी मिरवणुकीमध्ये घडलेल्या निंदनीय प्रकारामुळे तमाम शिवभक्त , शिवप्रेमी , शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या.सोशल मीडियातून टीकेची झोड उठल्या नंतर दि . १५ रोजी ६०० शिवभक्त व खासदार हेमंत पाटील व उपस्थित नसलेल्या अनेक शिवभक्तांवर राजकीय हेतूने गुन्हे दाखल करण्यात आले. यासंदर्भांत खासदार हेमंत पाटील व आ. संतोष बांगर हे काल ( दि. १६ ) रोजी पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात स्वतःहून अटक करून घेण्यासाठी गेले होते याप्रसंगी शिवभक्तांवरील गुन्हे येत्या आठ दिवसात मागे घेऊ असे शब्द पोलीस अधीक्षकांनी दिल्यामुळे आज ( दि. १७ )पुतळ्यावर चढून विटंबना केल्याच्या भावना शिवभक्तांमध्ये उमटत होत्या शिवभक्तांच्या भावना अनावर होऊ नये म्हणून पंच नद्यांच्या जलाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा जलाभिषेक करण्याचा निर्णय घेण्यात आला . यात नांदेडवरून उत्तर चे आ. बालाजी कल्याणकर हे गोदावरीचे पाणी , आ. संतोष बांगर यांनी कयाधुचे पाणी , माजी खा. शिवाजी माने यांनी पैनगंगेचे पाणी आणले तर खासदार हेमंत पाटील यांनी आसना आणि वसमत तालुका प्रमुख राजू चापके यांनी पूर्णेचे पाणी या जलाभिषेकासाठी घेऊन आले होते .
सकाळी ८ वाजेपासून हजारो शिवप्रेमी पुतळा परिसरात जमा व्हायला सुरवात झाली होती . जय जिजाऊ ..जय शिवराय.. छत्रपती शिवाजी महाराज कि जय या गगनभेदी घोषणेने आणि शिवभक्तांच्या स्वयंस्फूर्त जमावाने संपूर्ण वसमत शहर भगवेमय झाले होते .
आ. राजू नवघरे यांच्याकडून अनावधानाने हे कृत्य झाले आहे याचे कोणीही राजकारण करू नये असे आवाहन खासदार हेमंत पाटील यांनी शिवभक्तांना आणि शिवसैनिकांना केले. खासदार हेमंत पाटील व इतर ६०० शिवभक्तांवर गुन्हे दाखल करण्यात आले . त्यामुळे शिवभक्त व शिवसैनिकांच्या भावना मोठ्या प्रमाणात दुखावल्या गेल्या. सकाळी १० वाजता मुसळधार पावसाला सुरवात झाली . यावेळी काही जण हालचाल करत आहेत हे पाहून छत्रपती शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांनी स्वतःच्या छातीवर तलवारीचे वार घेऊन महाराष्ट्र धर्म राखला , महिलांची अब्रू राखली मंदिरे भ्रष्ट होण्यापासून वाचविली अश्या मर्द मावळ्यांचे आपण वंशज असून पाळपुट्यांचे नाही असे आवाहन खासदार हेमंत पाटील यांनी केल्यामुळे हजारों शिवभक्तांचा जनसमुदाय जागेवर बसून राहिला. जल्लोषपूर्ण वातावरणात छत्रपती शिवरायांचा जलाभिषेक सोहळा पार पडला .
यावेळी जि. प. अध्यक्ष गणाजी बेले, सहसंपर्क प्रमुख डॉ. रमेश शिंदे, जि. प.समाजकल्याण सभापती फकिरराव मुंढे, युवासेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम,जि. प.सदस्य विठ्ठल चौतमल, नंदकिशोर खिल्लारे, श्रीशैल्य स्वामी,प्रल्हादराव राखोंडे, उपजिल्हाप्रमुख सुनीलभाऊ काळे,परमेश्वर मांडगे यांच्या सह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवप्रेमी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.