अतिवृष्टीतील शेतकर्‍यांसाठी लवकरच धोरणात्मक निर्णय;  कृषीमंत्री सत्तार यांच्याकडून पुरग्रस्त भागाची पाहणी

कृषी

नांदेड,दि.21:- राज्यात अतिवृष्टीमुळे ज्या शेतकर्‍यांच्या पिकांचे, शेतजमिनीचे, पशुधनाचे आणि विशेषत: घरांचे नुकसान झाले आहे. त्यांना तात्काळ मदत कशी पोहचवता येईल याचे नियोजन आम्ही करत आहोत. याबाबत येत्या पाच दिवसात पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. महसूल यंत्रणा व कृषि विभाग यांनी समन्वयातून उरलेले पंचनामे तात्काळ कसे पूर्ण होतील याचे नियोजन करण्याचे आदेश कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.रविवारी सत्तार यांनी पुरग्रस्त भागाची पाहणी करून शेतकर्‍यांशी संवाद साधला.

येथील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन सभागृहात मराठवाडा विभागीय पातळीवरील कृषि आढावा बैठक त्यांनी घेतली. या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीसाठी माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा सदस्य अशोक चव्हाण, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार अमर राजूरकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहनअण्णा हंबर्डे, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार तानाजी मुटकुळे, आमदार रत्नाकर गुट्टे, प्रभारी जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, विभागीय कृषि सहसंचालक साहेबराव दिवेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, जिल्हा कृषि विकास अधिकारी डॉ. डी. जी. चिमनशेट्टे व व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आमदार डॉ. राहुल पाटील,  विभागातील सर्व जिल्हाधिकारी उपस्थित होते.

जुलै पर्यंत झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे झालेले आहेत. तथापि जुलै नंतरही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील काही मंडळात पाचवेळा तर काही मंडळात तीन वेळा तर काही मंडळात दोनवेळा अतिवृष्टी झाली. एकाच हंगामात पाच-पाच वेळा जर अतिवृष्टी होत असेल तर स्वाभाविकच या भागातील शेतकर्‍यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात आहे हे लक्षात घ्यावे लागेल. उर्वरीत पंचनामे अधिक गतीने पूर्ण करणे हे अत्यावश्यक असून सर्व जिल्हाधिकार्‍यांनी यात दक्षता घेऊन तात्काळ नियोजन करावे, असे कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

नांदेड जिल्ह्यात 89 मंडळापैकी तब्बल 82 मंडळात अतिवृष्टी आहे. जिल्ह्यातील 8 लाख 12 हजार हेक्टर कृषि क्षेत्रापैकी 50 टक्क्यापेक्षा अधिक क्षेत्र बाधित आहे. शेतकर्‍यांना झालेल्या नुकसानीबाबत अधिकाधिक मदत मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सद्यस्थितीत विधानसभेचे अधिवेशन सुरू असून अधिवेशाबाहेर कोणत्याही घोषणा करता येत नाहीत. ज्या-ज्या भागात जे नुकसान झाले आहे त्याची भरपाई तात्काळ मिळावी यादृष्टिने मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून वस्तुस्थिती सांगणार आहे. लवकरच याबाबत धोरानात्मक निर्णय घेतला जाईल, असे सत्तार यांनी स्पष्ट केले.
——
पूरग्रस्त भागाची पाहणी
पूरग्रस्त भागाची पाहणी, शेतकर्‍यांशी संवाद व प्रत्यक्ष गावातील परिस्थिती समजून घेण्यासाठी कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी विदर्भापासून दौरा सुरू केला आहे. आज नांदेड जिल्ह्यातील प्रातिनिधीक गावांना त्यानी भेट देऊन पाहणी केली. कासारखेडा, नांदुसा, विष्णुपुरी, जानापुरी, सोनखेड भागातील परिस्थितीची त्यांनी पाहणी केली.
——
आमदार गैरहजर, पुत्राने बळाकवली खुर्ची
लोहा-कंधार मतदारसंघाचे आमदार तथा माजी सनदी अधिकारी शामसुंदर शिंदे हे बैठकीला गैहजर राहिले. मात्र त्यांचे पुत्र शिंदे यांनी आमदारांच्या रांगेत ठाणमांडत मंत्र्यांना विनंती तर अधिकार्‍यांना सूचना देण्याचे काम केले.आजच्या बैठकीत आमदार शिंदे यांच्या पुत्राने खुर्ची बळकाल्याची चर्चा बैठकीत होती.