नाले सफाई तातडीने करा : महापौर सौ जयश्री निलेश पावडे यांचे निर्देश

नांदेड

नांदेड,बातमी24:-पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे .त्यामुळे पावसाळ्यातील संभाव्य अडचणी लक्षात घेता शहरातील सर्व छोट्या-मोठ्या नाल्यांची साफसफाई तातडीने पूर्ण करण्यात यावी, झाडेझुडपे कापण्यात यावेत, सखल भागात पाणी साचणार नाही यासाठीच्या उपाययोजना करावेत असे निर्देश महापौर सौ जयश्री निलेश पावडे यांनी दिले. महापौरांच्या कक्षेत आज मान्सून पूर्व आढावा बैठक पार पडली या बैठकीत त्यांनी या सूचना केल्या .
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत महापौर सौ जयश्री निलेश पावडे यांच्या कक्षात आज मान्सूनपूर्व आढावा बैठक पार पडली या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.
यावेळी उपमहापौर अब्दुल गफार, सभागृहनेते अडवोकेट महेश कनकदंडे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त डॉक्टर पंजाब खानसोळे, उपायुक्त निलेश सुंकेवार, यांच्यासह सर्व अधिकारी सर्व झोनल अधिकारी ,क्षेत्रीय अधिकारी यांच्यासह शहर अभियंता बाशेट्टी, कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, उपअभियंता सोनसळे, सतीश ढवळे आदींची उपस्थिती होती.
या बैठकीत संबंधित विभागाशी संवाद साधताना महापौर सौ जयश्री निलेश पावडे यांनी शहरातील ज्या ज्या सखल भागात पावसाळ्यात पाणी साचून अडचणी निर्माण होतात अशा सर्व भागाची तातडीने माहिती घेऊन प्रभावी उपाययोजना कराव्यात, शहरातील मोठ्या नाल्यांची आणि छोट्या सर्व नाल्यांची तातडीने साफसफाई करावी, त्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही महापौर सौ जयश्री निलेश पावडे यांनी या बैठकीत सांगितले . मान्सूनपूर्व कामांसाठी आवश्यक असणारे पोकलेन महापौरांनी या वेळी उपलब्ध करून दिले तर मान्सूनपूर्व स्वच्छता मोहिमेत आणि कामात कामचुकारपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा कडक इशाराही महापौरांनी दिला आहे.
दरम्यान पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड शहरातील नागरिकांना सर्व मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध आहे. पावसाळ्यातील संभाव्य धोके लक्षात घेता सर्व उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून नागरिकांनीही महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे. आपल्या परिसरात सकल भागात पाणी साचले असेल किंवा नाल्यांचे पाणी तुंबून पूर परिस्थिती निर्माण झाली असेल तर तात्काळ महानगरपालिकेचे संपर्क साधावा असे आवाहनही या वेळी महापौर सौ जयश्री निलेश पावडे यांनी केले.