आरोग्य विभागातील 84 कर्मचाऱ्यांच्या बदल्या;मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांनी मानले आभार

नांदेड

नांदेड, बातमी24- नांदेड जिल्‍हा परिषदे अंतर्गत कार्यरत विविध संवर्गातील कर्मचा-यांच्‍या सार्वत्रिक बदली प्रक्रिया दिनांक 20 मे पासून समुपदेशनाव्‍दारे जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू आहेत.

आज सोमवार दिनांक 23 मे रोजी तिसऱ्या दिवशी आरोग्य विभागातील 84 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात औषध निर्माण अधिकारी पदाच्या प्रशासकीय 3 तर विनंती 4 अशा एकूण 7 बदल्या झाल्या आहेत. आरोग्य सहाय्यीका पदाच्या 4 बदल्या करण्यात आल्या असून यात प्रशासकीय 1 तर विनंतीने 3 बदलत्या झाल्या आहेत. आरोग्य सहाय्यक पदाच्या 11 बदल्या करण्यात आल्या. यात प्रशासकीय 5 तर विनंतीने 6 कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या. आरोग्य सेविका या पदाच्या 40 बदल्या झाल्या. यात प्रशासकीय 27 व विनंतीने 13 बदल्यांचा समावेश आहे. आरोग्य सेवक पदाच्या 22 बदल्या झाल्या यात प्रशासकीय 11 तर विनंतीने 11 बदल्या करण्यात आल्या.
बदली प्रक्रियेत यावेळी जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे, अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, सामान्‍य प्रशासन विभागाचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी, डॉ. शिवशक्ती पवार, जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांची उपस्थिती होती. उद्या सोमवार दिनांक 24 मे रोजी शिक्षण विभागाच्‍या बदली प्रक्रियेला सकाळी 10 वाजल्या पासून सुरवात होणार आहे.
शासन निर्णयाच्‍या निकषानुसार समुपदेशाने बदली प्रक्रिया पार पाडल्‍या जात आहेत. जिल्‍हयातील सर्व तालुक्‍यात असणा-या जागांच्‍या समानिकरणानुसार पारदर्शक बदल्‍या करण्‍यात येत आहेत. आरोग्य विभागात विविध संवर्गांचे मोठ्या प्रमाणात कर्मचारी आहेत. दरवर्षी बदली प्रक्रियेला उशीर लागायचा परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी नियोजनबद्ध पध्दतीने बदल्या केल्‍यामुळे अल्प वेळेत पारदर्शक बदल्या झाल्या आहेत. याबद्दल जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांचा बुके देवून सत्कार केला.