नांदेड,बातमी24:- आयुष्याला शिस्त आणि स्वतः प्रति असलेला विश्वास आपल्याला बळ देत असते. विज्ञानात आपल्या जिज्ञासेला वाव मिळतो म्हणून विद्यार्थ्यांनी नवनवीन संकल्पना आकारात आणून नाविन्यपूर्ण विज्ञान प्रयोग तयार केले पाहिजे. यात मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळून त्याची सर्जनशीलता वाढते व मुलांमधील सुप्त शक्तीचा विकास होतो, असे प्रतिपादन आज नांदेड तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 49 व्या विज्ञान प्रदर्शनीच्या उद्घाटन प्रसंगी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. त्यावेळी त्या बोलत होत्या. मुख्याध्यापिका डी.व्ही. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महापौर जयश्री पावडे, प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉ. सविता बिरगे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, उपशिक्षण अधिकारी दिलीप बनसोडे, गटशिक्षण अधिकारी नागराज बनसोडे आदींची यावेळी उपस्थिती होती.
पुढे त्या म्हणाल्या, मुलांमध्ये प्रचंड कल्पनाशक्ती असते, त्याचा उपयोग शिक्षकांनी करून घेणे आवश्यक आहे. इतर विषयांसह विज्ञान विषयात विद्यार्थ्यांची रुची वाढवण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा. विज्ञानातले नवनवे प्रयोग विद्यार्थ्यांना शिकवावेत. विज्ञान प्रदर्शनातून अनेक शास्त्रज्ञ देशाला मिळू शकतात, असेही त्या म्हणाल्या.
पुढे त्या म्हणाल्या, आपल्याला काय व्हायचे ते मुलांनी शाळेपासूनच ठरवावे. मोबाईल व टिव्ही मध्ये वेळ घालवण्यापेक्षा अभ्यासाकडे लक्ष द्यावे तर आपण निश्चित ध्येय गाठू शकतो. शास्त्रज्ञ होण्यासाठी विज्ञान विषयात रुची ठेवणे, विज्ञानाचे नवनवे प्रयोग सादर करावे. विज्ञान कथा वाचाव्यात. शाळांमधून आठवड्यातून एक तास गोष्टींचा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावावी असेही त्या म्हणाल्या.
यावेळी तालुक्यातील 84 शाळांनी विज्ञान प्रदर्शनात सहभाग नोंदवला होता. यावेळी विना इलेक्ट्रिक फ्रिज, प्रदूषण नियंत्रण संच, सौर विद्युत घट, आधुनिक शेती, मळणी यंत्र, इलेक्ट्रिक उपकरण, भूकंप रोधक प्रकल्प, डिजीटल सायकल, कच-यापासून विद्युत निर्मिती आदी विज्ञान प्रयोग विद्यार्थ्यांनी सादर केले होते. विज्ञान प्रदर्शातून इयत्ता 6 वी ते 8 वी व इयत्ता 9 वी ते 12 वी या दोन गटातून प्रत्येकी तीन उत्कृष्ट क्रमांक काढण्यात येणार आहेत. यावेळी शिक्षण विभागाचे अधिक्षक गंजेवार, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. विलास ढवळे, मिलिंद व्यवहारे, विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी, लता कौठेकर, डी.टी. शिरसाठ, प्रंशात सोनक, शिक्षक व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.