भारत जाेडाे यात्रेचे उद्या देगलूर येथे आगमन भोपाळा, कृष्णूर येथे काॅर्नर मिटिंग गुरुवारी नांदेड येथे प्रचंड जाहीर सभा

नांदेड

नांदेड, बातमी24 ः काॅंग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारीपासून सुरु झालेल्या भारत जाेडाे यात्रेच्या स्वागतासाठी नांदेड जिल्ह्यातील काॅंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सर्व स्तरातील नागरिकांत उत्साहाचे वातावरण दिसत आहे. या यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी झाली असून यात्रेचे नांदेड जिल्ह्यातून महाराष्ट्रात आगमन हाेण्यास अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यादृष्टीने राज्याचे माजी मुख्यमंत्री अशाेकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड शहर व जिल्हा काॅंग्रेस कमिटीचे पदाधिकारी आणि जिल्हाभरातील कार्यकर्ते झपाटून कामाला लागले आहेत. या यात्रेत जिल्हाभरातील सर्व स्तरातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नांदेड जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीतर्फे करण्यात आले आहे.
काँग्रेसग् नेते खा. राहुल गांधी यांची भारत जाेडाे यात्रा तेलंगणातून महाराष्ट्रात आगमन करणार आहे. तेलगंणा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या देगलूर तालुक्याला या यात्रेचे प्रथम स्वागत करण्याचे भाग्य लाभले आहे. साेमवारी (दि. सात) सायंकाळी 7.30 वाजता देगलूर येथे यात्रेचे आगमन हाेईल. देगलूर येथील नगर परिषदेशेजारी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे यात्रेचे आगमन झाल्यानंतर यात्रेचे जिल्हावासियांतर्फे जाेरदार स्वागत करण्यात येणार आहे. तेथे स्वागत स्वीकारुन भारत जाेडाे यात्रा रात्री नऊ वाजता वन्नाळीकडे निघेल. रात्री 11 वाजता यात्रेचे वन्नाळी येथील गुरुद्वारा यादगार साहिबजादे बाबा जाेरावरसिंघजी बाबा फतेहसिंघजी वन्नाळी येथे यात्रेचे आगमन झाल्यानंतर श्री गुरुनानक देवजी यांचे गुरुपुरब अरदास केली जाईल. मंगळवारी (दि. 8) सकाळी 7.30 वाजता वन्नाळी गुरुद्वारा येथून पत्रयात्रेला पुन्हा प्रारंभ हाेईल. दुपारी पदयात्रेसाठी वझरगा येथे राखीव वेळ आहे. दुपारी 3 वाजता खतगाव फाटा येथून पदयात्रेला प्रारंभ हाेईल. सायंकाळी 5.30 वाजता पदयात्रा भाेपाळा येथे पाेहाेचल्यानंतर खा. राहुल गांधी तेथे काॅर्नर मिटिंग घेणार आहेत. बुधवारी (दि. 9) सकाळी 5. 45 वाजता शंकरनगर रामतीर्थ येथून पदयात्रेला प्रारंभ हाेईल. पदयात्रेच्या मार्गात दुपारचा वेळ नायगाव येथे राखीव असेल. त्यानंतर दुपारी 3 वाजता नायगाव येथील कुसुम लाॅन्स येथून पदयात्रेला प्रारंभ हाेईल. सायंकाळी 5.30 वाजता खा. राहुल गांधी यांची कृष्णूर एमआयडीसी येथे काॅर्नर मिटिंग हाेईल. गुरुवारी (दि. 10) सकाळी 5.45 वाजता कापशी गुंफा येथून पदयात्रेला प्रारंभ हाेईल. दुपारी चंदासिंघ काॅर्नर (नांदेड) येथे पदयात्रा पाेहाेचल्यानंतर वेळ राखीव आहे. त्यानंतर दुपारी 3 वाजता नांदेड शहरातील देगलूर नाका येथून पदयात्रेला प्रारंभ हाेईल. ही पदयात्रा शहरातून नांदेडच्या नवा माेंढा मैदानावर पाेहाेचेल. तेथे सायंकाळी 4.30 वाजता खा. राहुल गांधी यांच्या भव्य जाहीर सभेचे आयाेजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि. 11) सकाळी 5.45 वाजता पदयात्रेला दाभड येथून प्रारंभ हाेणार आहे. पदयात्रा काळात दुपारी पार्डी मक्ता येथील स्वामी फार्म हाऊस येथे राखीव आहे. त्यानंतर दुपारी 3 वाजता चाेरंबा फाटा येथून पदयात्रेला प्रारंभ हाेऊन ही पदयात्रा हिंगाेली जिल्ह्याकडे प्रयाण करणार आहे.
खा. राहुल गांधी यांच्या या भारत जाेडाे पदयात्रेला केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा या राज्यांत अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात यात्रेचे अभूतपूर्व आणि एेतिहासिक असे स्वागत करण्याच्या दृष्टीने राज्याचे माजी मुख्यमंत्री अशाेकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा काॅंग्रेस कमिटीच्या वतीने जय्यत तयारी सुरु आहे. नांदेड शहर आण जिल्हाभरातील सर्व स्तरातील नागरिक, महिला, पुरुष, तरुण, तरुणींनी या यात्रेत माेठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नांदेड शहर आणि जिल्हा काॅंग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
—–
चाैकट
—-
भारत जाेडाे यात्रेत पहिल्यांदाच रात्री मशाल यात्रा निघणार आहे. दि. 8 नाेव्हेंबर राेजी शीख धर्माचे संस्थापक श्री गुरु नानक देवजी यांची जयंती आहे. त्यामुळे रात्री बारा वाजता गुरुद्वारात जाऊन दर्शन घेतले जाणार आहे.
——-